MSRTC Vehicle Tracking System: एसटी कुठे पोहोचली हे आता कळणार मोबाईलवरच, प्रवाशांसाठी नवा दिलासा!

MSRTC Vehicle Tracking System: महाराष्ट्रात ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच आहे. सकाळी शाळा, कामावर जाण्यापासून ते रात्री घरी परत येईपर्यंत, एसटीची साथ ही कित्येक लोकांसाठी आधार असते. पण जेव्हा ही लालपरी वेळेवर येत नाही, तेव्हा सुरू होतो प्रवाशांच्या संयमाचा आणि वेळेचा कस. उगाच त्यांना किती तरी वेळ बसस्टॉप वर वाट पाहत बसावं लागतं, कधी वेळेवर पोहोचणं शक्य होत नाही आणि नाहक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन आता राज्य परिवहन महामंडळाने एक नवी आणि अत्यंत उपयुक्त सुविधा सुरू केली आहे, आणि ती म्हणजे व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम.

लालपरी आता नकाशावर

राज्यातील प्रत्येक एसटी बसमध्ये आता एक विशेष उपकरण बसवण्यात येणार असून, त्याच्या मदतीने त्या बसचं सध्याचं नेमकं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) प्रणालीमुळे बस कुठपर्यंत पोहोचली आहे, बस स्टॉपवर ती केव्हा पोहोचणार आहे याची माहिती आता प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उगीच वेळ वाया घालवत थांबायचं कारण उरणार नाही.

ही सुविधा नक्की कशी चालते?

  • प्रत्येक एसटी बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार आहे.
  • बसमधील तिकीटावर तुम्हाला एक ट्रिप कोड दिलेला असेल, तो कोड तुम्ही तुमच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये टाकून त्या बसचं योग्य ते लोकेशन पाहू शकता.
  • मुंबई सेंट्रलमध्ये एक अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे, जिथे प्रत्येक बसच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
  • यामुळे बसचं नेमकं स्थान, मार्ग आणि पुढचा स्टॉप कोणता याची अचूक माहिती प्रवाशांना मिळेल.

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही सुविधा का ठरणार आहे वरदान?

एसटी ही केवळ एक प्रवासाचं साधन नसून ग्रामीण महाराष्ट्रासाठी ती त्यांची जीवनरेषा आहे. अनेक गावांमध्ये खासगी वाहतूकसुद्धा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत एसटी वेळेवर न आल्यास शाळा, कॉलेज, दवाखाना किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांसाठी ही नवी सुविधा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

महामंडळाचं जाळं आणि समस्येचा आढावा

एसटी महामंडळ रोज सुमारे ५० हजार मार्गांवर १ लाख २५ हजार बसच्या फेऱ्या घेते. पण ही यंत्रणा वेळेच्या बाबतीत कायमच मागे पडत होती. विशेषतः लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये एसटी वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत होती. काही जण तर वेळेआधीच बस स्टॉपवर पोहोचतात, पण बस खूपच उशिराने येते. अशा वेळेला वेळ वाया जाणं, वैताग आणि अन्य कार्यक्रम बिघडणं हे सगळं टाळता आलं असतं, जर बसचं लोकेशन वेळेवर समजलं असतं तर.

आता हे सगळं बदलणार आहे

या नव्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिममुळे पुढील फायदे मिळणार आहेत:

  • प्रवाशांचा वेळ वाचेल, अचूक वेळेची माहिती मिळाल्याने प्रवास नियोजन सोप्पं होईल.
  • विश्वासार्ह सेवा आहे त्यामुळे एसटीच्या सेवा आणखी शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होतील.
  • ग्रामीण कणा मजबूत होईल, बसची माहिती मिळाल्यामुळे गावागावातल्या लोकांचा प्रवास अधिक सुलभ होईल.
  • तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून, डिजिटल युगात एसटी महामंडळाची पावलं आधुनिकतेकडे वळली आहेत.

ही यंत्रणा उभी करण्यामागे कोण आहे?

या संपूर्ण सुविधेच्या अंमलबजावणीसाठी रोस मार्टा कंपनीने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी रूट मॅपिंग, सिस्टिम इंटिग्रेशनसारखी कामं पार पाडली आहेत. एसटी महामंडळानेही आपला ऑपरेशनल पॅटर्न बदलून या यंत्रणेचा समावेश केला आहे.

प्रवाशांनी काय करावं?

  • सर्वप्रथम, एसटी व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
  • बसचं तिकीट घेतल्यावर दिलेला ट्रिप कोड अ‍ॅपमध्ये टाका.
  • अ‍ॅपमधील माहिती वेळोवेळी अपडेट होत राहील आणि तुम्हाला बसचं सध्याचं नेमकं स्थान समजेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment